परसदारातील शेती: अन्न, उत्पन्न आणि आत्मसन्मान मिळवून देणारी एक साधी परंपरा
पेण तालुक्यातली दिवाणमाळ गावात सकाळची सोनेरी उन्हं नुकतीच अंगणात उतरलीयेत.
अंगणात प्रतिभा मामींची लगबग जाणवतेय.
त्यांच्यासोबत अजून १६ जणीची पण.
सुखवलेली हळद दळायला दयायची घाई सुरू आहे.
किती जुनं नातं हळदीचं. संस्कृतीशी. परंपरांशी. आरोग्याशी.
खमंग फोडणी. सण-समारंभ.
कापल्यावर रक्ताची धार थांबवणारी चिमूटभर हळद.
स्त्रियांच्या जरा जास्त जवळची.
एक सृजनशील. तर दुसरी स्वत:च सृजन.
परसबागेतली ही हळदीची शेती. शेती पेक्षा सखिच जास्त.
घरातली कामं आवरता-आवरता करता येणारी.
छोटेखानी घरामागची आटोपशीर जागा. त्यात साध्या पारंपरिक पद्धतीची हळदीची शेती.
कुदळ, फावडयाने जमीन खणून उन्हात चांगली तपवायची. घरगुती शेणखत त्यात आठवणीने मिसळायचं.
पावसाची चाहूल लागता लागता मे महिन्याच्या शेवटाला हळदीचे कंद पेरायचे निगुतीने.
पाऊस असेपर्यंत पाण्याची चिंता नाही. त्यानंतर जुलै मध्ये तण काढणं. ऑगस्ट मध्ये अजून थोडी मशागत अशी कामं चालू.
जानेवारी फेब्रुवारीत हळदीची हिरवीगार पानं पार जमिनीवर लोळतात. सगळा हिरवाकंच साज उतरवून वाळतात. मग पानं छाटून हळदीचे गडडे जमिनीतून काढायचे.
गोमूत्राच्या पाण्यात निर्जंतुक करायचे. कौलांवर वाळत टाकायचे. हळदीच्या सुगंधाची कौलं.
हळद पूर्ण वाळली की पोत्यात घालून स्वच्छ करायची, लाकडाने ठेचायची आणि गिरणीत दळून आणायची.
ही हळद थोडी घरासाठी ठेऊन बाकीची विकायची. त्यातून येणारं उत्पन्न घरासाठी वापरायचे.
या स्त्रियांच्या मुळातच कष्टाळू, उत्साही, जिद्दी स्वभावाला अजून काय हवं?
पीक चांगलं यावं यासाठी वैज्ञानिक मार्गदर्शन.
नवीन पण सोप्या साधनांची माहिती.
त्यांच्या उत्पन्नाला योग्य बाजारभाव.
आणि ही मदत ‘राह फाऊंडेशन’ ने केली. राह च्या कृषि तज्ञानी वेळोवेळी या परसबागेला भेट दिली. लागवडी आधीची बीज प्रक्रिया. पारंपरिक पण किफायतदार आशा सरी-वरंबा पद्धतीने लागवड. सेंद्रिय कीटक नाशकं, त्यांची फवारणी, या सगळ्याची प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन राहच्या तज्ञानी नियमितपणे केलं. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतिने शेती कारणाऱ्या इतर तज्ञांशीही या महिलाची भेट घडवून दिली. त्यातून बऱ्याच मूलभूत गोष्टींची माहिती मिळाली.
विज्ञान, परंपरा आणि ‘राह’चे मदतीचे हात यांचा सुरेख मेळ साधत दिवाणमाळच्या या सतरा महिलानी परसबागेत तब्बल २५ किलो हळद पिकवली. त्यातून त्यांना ४१,०००/- रुपयांपेक्षा जास्त मिळकत झाली. तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे गेल्या वर्षापेक्षा उत्पन्न जास्त मिळाले.
यातून महिलाना प्रेरणा मिळाली. त्यांची तयारी आणि उत्साह पाहून राह ने त्यांना पिकांमध्ये विविधता आणून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची संकल्पना सुचवली. सगळ्या महिला एकमताने तयार. परसबागे व्यतिरिक्त त्यांच्याकडे असलेल्या साधारण १.५ एकर जमीनिसाठी राह ने वेगवेगळ्या भाज्यांची (वांगी, मिरची, वाल, टोमॅटो) बियाणी पुरवली. तज्ञांची मदत जोडीला होतीच.
हळदीचं पीक वर्षाचं तर हे भाज्यांचं पीक छोटया कालावधीचं. भाजीपाल्याच्या शेतीतून ४ ते ५ महिन्यात महिलाना उत्पन्न मिळायला लागलं. या दोन्ही पिकातून २३-२४ साली साधारण १,६५,००० इतकं उत्पन्न मिळालं. या अंगणवाडी शेतीतून महिलांना घरासाठी ताजं आणि पोषणमूल्य असलेलं अन्न तर मिळतच आहे पण अतिरिक्त भाजीपाल्याची बाजारात विक्री करून उत्पन्नही मिळवता येतंय. शेतीमध्ये विविध पिकांची लागवड केल्याने हवामानातील बदलांनाही तोंड देता येतंय.
महिलांच्या मेहनतिला अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्याचा हा उपक्रम, राह फाऊंडेशन, आता पेण तालुक्यातील इतर गावातल्या महिलासोबत राबवत आहे. २०२२ २०२५ या वर्षात राह सोबत १४० पेक्षा जास्त आदिवासी शेतकरी जोडले गेले आहेत आणि यशस्वीरीत्या शेती करत आहेत. २०२५-२६ मध्ये १८० पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत आमचे काम चालू आहे आणि यापुढील वर्षात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा उद्देश आहे.
काही अनुभवी, काही सुरकुतलेले, काही नुकतीच हळद उतरलेले हात सुद्धा आता अजून सशक्त, स्वतंत्र स्वयंपूर्ण होत आहेत आणि शाश्वततेकडे वाटचाल करत आहेत.
Authored by: Veena Joshi, VP-Communications